Monday, August 2, 2010

मैत्री की पार्टनरशिप?




मैत्रीचे नातेच वेगळे असते. कारण त्यात कोणताही कॉन्ट्रॅक्ट किंवा कागदपत्र नसतात. आपण आई-वडील, भाऊ-बहीण निवडू शकत नाही. पण ‘मित्र’ कोण असावे हे आपण स्वत:च ठरवतो. मग हे नाते सांभाळावे कसे हेही आपल्यालाच पहावे लागते. दोन मित्र जेव्हा अगदी खास होतात तेव्हा बर्‍याचदा त्यांना एकदम काम करावे असा विचारही येतो. अशा अनेक जोड्या व्यवहारात दिसून येतात. एकत्र धंदा करण्यासाठी पार्टनरशिप करतात, पण हा इतिहास आहे पैशाचा आवळ बसला की मैत्रीला गळफास लागतो. व्यवहाराच्या स्वार्थी समुद्रात नाती बुडून मरण पावतात. एकमेकांच्या सुख-दु:खात चिकटून दिसणारे एकमेकांची तोंडं पहायलाही नकार देतात. प्रगती, चढाओढ, कमाई हे सर्व गरजेचेच, पण काही नात्यांना यातून वगळलेच पाहिजे. सख्खे भाऊ एक दुसर्‍याला खाली पाडून आपला धंदा मोठा करण्याचा प्रयत्न करतात तर मग काय. मित्रांनी एकदम धंदा करू नये असे माझे मत नाही; पण केला तर त्यात मैत्री जास्त आणि फायदा कमी पहावे आणि हे एकतर्फा असून चालायचे नाही. मित्रांबरोबर धंदा करण्याआधी नियम नीट ठरवा. या सर्व घडामोडीत धंदा आणि पार्टनरशिप मोठी की नाते हे सुरुवातीलाच स्वत:ला सांगा. हे सर्व पाळूनही कधी कधी मतभेद होऊ शकतात. पार्टनरशिप तुटू शकते. मैत्रीला तडा जाऊ शकतो. असे होऊ नये, पण असे झालेच तरी मैत्री विसरू नका. असे नेहमी पाहिले जाते की पार्टनरशिप तुटली की पार्टनरबद्दल नको नको ते बोलले जाते, आपण किती सरळ असून आपल्याला दगा दिला गेला याचे प्रदर्शन भरवले जाते. तडा गेलेल्या मैत्रीचा मग चर्राच होतो. पार्टनरशिप तोडा वाटल्यास, पण मैत्री तोडू नका. सॉक्रेटस नावाचा एक खूप मोठा ज्ञानी होता. तत्त्वज्ञानाचा अभ्यासक म्हणून लोक त्याला मानत. त्याच्या एका घनिष्ठ मित्राचे व त्याचे काही विषयावरून मतभेद झाले. त्यांचे ठरवलेले काम ठप्प पडले. याच काळात त्याचा एक नातेवाईक आला व त्याच्या तुटलेल्या मैत्रीवर टीका करू लागला. तुझ्या मित्राबद्दलची एक सॉलिड माहिती देऊ का?’’ असे त्याने सॉक्रेटसला विचारले. सॉक्रेटस म्हणाला, आधी तीन प्रश्‍नांची उत्तर दे!
‘‘ती माहिती खरी आहे का?’’ नातेवाईक म्हणाला, ‘‘माहीत नाही.’’
‘‘ती माहिती चांगली आहे का?’’ नातेवाईक म्हणाला, ‘‘अजिबात नाही.’’
‘‘ती माझ्या उपयोगाची आहे का?’’... ‘‘नाही.’’
‘‘जर ती माहिती खरी नाही, चांगली नाही आणि माझ्या उपयोगाचीही नाही, मग मी का ऐकू.’’ असे म्हणून सॉक्रेटसने आपली मैत्री सिद्ध केली. व्यवहार आणि मैत्री नेहमीच वेगळी ठेवा. मैत्रीचे स्थान खोल हृदयात असते. तिला पैशाखाली तुडवून कोर्टात खेचू नका. ‘मैत्री आणि पार्टनरशिप’ दोन्ही नीट चालेल यावर लक्ष ठेवा.

1 comment: