Saturday, August 7, 2010

कुबड्या वाटू नका



लोकांना मदत करणे हा फारच चांगला गुण आहे. कॅार्पोरेट जगतात तर याची फारच गरज असते. एकमेकांना सहाय्य करूनच प्रगतीचा डोंगर ओलांडता येतो, पण मदत करणे आणि एखाद्याला आपल्या आश्रयावर अवलंबून ठेवणे यात फरक आहे. आपले स्थान स्थिर करण्यासाठी आपण दुसर्‍याला अपंग करणे याला मदत नाही, गुन्हा म्हणतात. कधी कधी प्रेमाखातर आपण आपल्यांना संरक्षणाच्या भावनेत घुसमटून टाकतो. जगाशी संपर्क साधण्यापासून दूर ठेवून त्याच्या प्रगतीच्या प्रवासातील गतिरोधक बनत राहतो. धोक्याची भीती बाळगून न जगणे व न जगू देणे हा मूर्खपणाच होय. एक गो सांगते, एका माणसाला एका किड्याचा कोश सापडला. त्या कोशाला जवळून पाहता त्याच्या एका बाजूला भोक दिसले. त्या भोकातून एक फुलपाखरू बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना आढळले. त्या फुलपाखराची धडपड व झटापट त्या माणसाला बघवत नव्हती. फुलपाखराने धीर सोडल्यासारखे वाटले. धडपड थांबवली. ते थकले बहुतेक. माणसाला दया आली व त्याने त्या फुलपाखराला मदत करायचे ठरवले. त्या कोशाचा पुढला भाग कात्रीने कापून त्याने थोडा मोठा केला. असे करताच ते फुलपाखरू सहजपणे बाहेर पडले, पण ते बाहेर येताच कोलमडून पडले. माणसाला आश्‍चर्य वाटले. त्याची अपेक्षा होती की बाहेर पडताच त्या फुलपाखराने सुंदर पंख पसरावे व आपल्या शरीराला आधार देऊन या जगाची सुंदरता वाढवावी, पण तसे काहीच झाले नाही. झाले काय तर त्या फुलपाखराचे आयुष्य कोमेजून गेले. ते उडूच शकले नाही. तेव्हाही नाही आणि कधीच नाही. माणसाने तर मदत केली, पण मग ही चांगली भावना असून असे का झाले असेल? त्याचेही कारण आहे. फुलपाखरू कोशातून बाहेर पडण्याकरिता खूप जोर लावते. हा जोर लावल्यामुळेच पंखांमध्ये आवश्यक प्रवाही पदार्थ जमा होतो व पंख मजबूत होतात. असे झाले की मग फुलपाखरू भरारी घेऊ शकते. त्या दानशूर माणसाने फुलपाखराला मदत केली असे त्याला वाटले, पण खरे तर त्या फुलपाखराला त्याच्या जीवनावश्यक अनुभवापासून दूर केले. बर्‍याचदा संघर्ष ही आपली गरज असते. जर त्या संघर्षातून आपण स्वत:ला लपविण्याचा प्रयत्न केला तर आपणही कोलमडून पडू अगदी या फुलपाखरासारखेच. आपल्या पंखात आत्मविश्‍वास वाढू द्या. जीवनात उंच भरार्‍या घ्यायच्या असतील तर संघर्ष चुकवून चालणार नाही. तसेच कुणालाही मदत करताना हा विचार करा. ‘तुम्ही पंख कापताय की त्यांना बळ देताय?’ बळ द्या, अपंग नका करूत. मदत करा. खूप मदत करा. आत्मविश्‍वास व धाडस वाटा. कुबड्या वाटू नका.

No comments:

Post a Comment